प्रभावी अध्ययन-अध्यापनाचा वेगळा प्रकार
मुलामुलींचे शिक्षण आणि त्यांचा सर्वांगीण विकास,हा स्वातंत्र्यानंतर गेली जवळजवळ पंचाहत्तर वर्षे सतत चर्चेत राहिलेला विषय आहे. ह्या बाबत वेगवेगळ्या आयोगांनी विविध पद्धतीने विचार केला.कधी 'आनंददायी शिक्षण' तर कधी 'सर्व शिक्षा अभियान',असे घोषवाक्य दिले गेले.कधी कृतीयुक्त अध्ययन-अध्यापन,तर कधी सत्र पद्धत.परीक्षा पद्धतीत बदल झाले. अंतर्गत मूल्यमापनाचा प्रयोग झाला. परंतु या सर्व प्रयोगांचे काही अपवाद वगळता,फलित काय आढळते? खरंच शिक्षणात आनंद निर्माण झाला कां? खरंच सर्व शिकून पुढे गेले का? कृतीयुक्त अध्यापन पद्धतीची किती प्रमाणात आणि किती गुणवत्तापूर्ण अम्मल बजावणी झाली ? सत्र पद्धतीने विद्यार्थ्यांना पास होणे सोपे झाले असेल परंतु ही गुणवत्ता किती काळ टिकली ? फार दूरचं कशाला? या वर्षी दहावी बारावी परीक्षा कोरोनामुळे न होता सर्वांना उतीर्ण केले.कोरोनाच्या महामारीत जीव जास्त महत्त्वाचा,म्हणुन ते योग्यही आहे.परंतु आता होणाऱ्या सी.ई.टी. परीक्षेची धास्ती किती जणांना पडली आहे?केवळ परीक्षा रद्द म्हटल्यावर जेमतेम एक दिड महिन्यात जर ह्या अभ्यासाची अशी त-हा होत असेल,तर हे शिक्षण किती अल्प जीवी ? या वर्षी मुलांना शाळा महाविद्यालये जवळजवळ बंद राहिल्याने शिकण्याची संधी मिळाली नाही हे खरं आहे.परंतु दर वर्षी तरी कुठे वेगळे चित्र असते ? नाहीतर सी.ई.टी.च्या क्लासेसची चलती झाली असती कां?
'चिंता आणि चिंतनाचा विषय'
सध्या शिक्षण हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाला आहे.मुलांना शाळेच्या सुट्टीचा होणारा आनंद आणि अभ्यासाची अजिबात आवड नसणे,हा समस्त शिक्षण प्रेमींचा पराभव आहे,असं माझं स्पष्ट मत आहे.आवडीची मालिका,क्रिकेटची रंगात आलेली मॕच चालू असताना वीज गेल्यास जी निराशा होते ती,शाळा लवकर सुटल्यास किंवा शाळेला पूर्ण सुट्टी असल्यास होते कां? जसा प्रत्येक जण मोबाईल मध्ये दिवस दिवस रमतो आणि पालकांनी 'आता मोबाईल बंद' असे सांगितले तर त्याची नाराजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते,तसे भाग्य 'आता अभ्यास बंद',असे म्हटल्यावर मूल निराश होण्यात ज्या दिवशी होईल तो सुदिन ! यावर मी गेली चाळीस पंचेचाळीस वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात भटकंती करुन,प्रत्येक जिल्ह्यात जाऊन, शाळा शाळातून केलेले प्रयोग,अनुकरणीय ठरतील कां,याचा त्रयस्त नजरेतून विचार व्हावा,या साठीच हा लेखन प्रपंच!
'शिक्षा हा अपवाद,तर शाबासकी हा नित्याचा प्रयोग'
एखादी गोष्ट आवडीने करण्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे.केलेल्या कामाला योग्य दाद(प्रसिद्धी)मिळावी,ही जर भल्या भल्यांची अपेक्षा असते,तर मुलामुलींच्या छोट्याशा कामालाही 'शाब्बास', असे म्हणताना आपली जीभ कां बरं अडखळावी?कौतुक सर्वांच्या समोर आणि उणीवा मात्र एकट्याला कानात सांगणे, हे शक्यच नाही कां ? खरंतर हे फक्त मुलांच्या बाबतच नाही तर सर्वांच्या बाबतच वापरायचे सत्य आहे. परंतु सर्वत्रच मेमो देताना वरिष्ठांची लेखणी जशी तेजीत चालते तशी कौतुकाच्या बाबतीत चालेल तर ?
शिक्षकांनी पालक मेळाव्यात पालकांच्या समोरा मुला मुलीचे कौतुक करुन पहा. जादू घडल्याशिवाय राहणार नाही.
अभ्यासाचा नाद लावता आला तर…..
'घोड्याला पाण्यापर्यंत नेणे आपले काम परंतु पाणी पिणे घोड्याचेच ना',हे वाक्य वरवर खरे वाटले तरी हे अर्ध सत्य आहे.घोड्याला जर तहानच लागली नसेल तर घोडा नदीत पूर्णपणे बुडविला तरी तो पाणी पिणारच नाही.मुलांना शिकण्याची तहान लागली पाहिजे. मग पहा ती कशी अभ्यासाच्या नादी लागतील.अर्थात आपल्या सर्वांच्या मनात 'ती अभ्यासाच्या कशी नादी लावायची',हाच यक्ष प्रश्न असेल.खरं नां? त्या बाबतच मी केलेले प्रयोग पहा कसे वाटतात ते.
' सर्व विषयातील मूलभूत संकल्पनांचे दृढीकरण'
खरंतर प्रत्येक विषयात काही संकल्पना अगदी मूलभूत आहेत.शंभर टक्के विद्यार्थ्यांचे शंभर टक्के संकल्पना ग्रहण करण्यात आपण यशस्वी झालो तर? सायकलच्या बाबतीत 'सायकल सकाळी उत्तम येत होती परंतु आता येत नाही', हे म्हणणे जितके हास्यास्पद आहे,तितकेच '८९ ही संख्या मला दुसरीत लिहीता,ओळखता येत होती परंतु आता गोंधळ होतो' हे म्हणणे हास्यास्पद नाही कां ?परंतु प्रत्येक इयत्तेत अशा कितीतरी मूलभूत संकल्पना नव्याने येतात परंतु त्या दृढ न झाल्याने प्रत्येक वर्गात त्या नव्याच वाटतात.त्या पक्क्या असणाऱ्या मुलामुलींना त्यांचा संबंधित पाठ्यभाग सोपा जातो.अर्थात त्यामुळे पुढील पाठ्यभाग करण्यात रुची वाढते.ज्यांच्या अशा मूलभूत
संकल्पना कच्च्या असतील त्यांना त्यांचा पाठ्यभाग कसा कळेल ? तो न कळल्यास अभ्यास करावासा वाटणारच नाही.
'संकल्पना दृढ करण्यासाठीचे वेगवेगळे उपक्रम'
३५मिनिटांच्या तासिकेला वही पेन घेऊन बसलेले जे विद्यार्थी तासिकेच्या शेवटी 'काही कळले नाही' असे म्हणतात,त्यांना दिवसभर चाललेल्या क्रिकेट मॕचच्या प्रत्येक षटकाचा तपशील काहीही लिहून न घेता कां सांगता येतो ?
कारण एकाग्रता.'एकाग्रता यशोबीजम्'. ही एकाग्रता वाढविण्यासाठी अध्यापनात नेहमीच्या औपचारिक माध्यमांच्या बरोबरीने मी कीर्तन, सवाल-जबाब,भारुड, पोवाडा,अभ्यास नाट्य,जादूचे प्रयोग,खेळ,कोडी, कूटप्रश्न, पाठ्य विषयावरील गेय कविता,कथाकथन,अशा विविध माध्यम प्रकारांचा वापर केला.
सूक्ष्म अध्ययन,स्वतः वाचून,विचार करुन,समजून कृती
यासाठी प्रत्येक संकल्पनेचे खूप छोटे छोटे भाग करुन प्रत्येक भाग दृढ करीत संकल्पना दृढ करणे.जसे तीनच्या विभाजकतेची कसोटी.यात संख्येतील अंक ओळखणे, त्यांची बेरीज करणे,तीनच्या पाढ्यात असणाऱ्या संख्या ओळखता येणे,असे ३ भाग पडतात. यांचे एकत्रीकरण म्हणजे ती कसोटी.संकल्पना समजली की भरपूर सराव. परंतु मग तो आवडीने होतो.
कवितेतून दीर्घकाळ स्मरणाचा पूर्व परंपरागत मार्ग
आपल्याकडे प्रत्येक बाबतीतच दोन टोकं असतात. स्मरण कौशल्याबाबतही तसेच आहे. पाठांतरात काही अर्थ नाही पासून पाठांतरा शिवाय काहीच नाही,अशी ही टोकं आहेत. प्रत्येक विषयात काही भाग नक्की असा असतो की जो त्याची भाषा उलगडण्यास पूरक ठरतो.विज्ञान म्हणजे समजून घेणे,विज्ञान म्हणजे प्रयोग,विज्ञान म्हणजे अनुभव हे सगळे जरी खरे असले तरी सोडिअमचे चिन्ह Naआहे ,हे असेच्या असेच लक्षात राहणे आवश्यक आहे नां ? त्याचा शास्त्रीय दृष्टिकोनाशी काय संबंध आहे ? असा पाठ्यभाग मी गेय कवितात केल्यामुळे माझ्या बहुतेक विद्यार्थ्यांच्या या कविता आजही पाठ आहेत आणि ते संयुगाच्या रासायनिक नावावरुन संयुगाचे सूत्र अचुक लिहितात.जो भाग समजून घेणे महत्त्वाचे आहे. तोही भाग जर समजल्यानंतर सूत्र रुपात पाठ असेल तर वेग वाढणार नाही कां? जसे आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असे कसे आणि कां येते,हे समजणे महत्त्वाचे असले तरी ते समजल्यानंतर आपण ते लक्षात ठेवण्याचाच राजमार्ग निवडतो. खरं ना? अशी असंख्य जीवन सूत्रे पूर्वीच्या थोर विभुतींनी श्लोकबद्ध ओवीबद्ध केली आहेत नां? अशा पाठ्यविषयावरील विविध विषयांच्या गेय कवितांनीच मला कीर्तीच्या शिखरावर नेऊन ठेवले.
खेळ,जादू,थोडी गंमत,मेंदूला व्यायाम.
पूर्णांकावरील चार क्रिया,( Operations on integers.) यामध्ये जर विद्यार्थी निपूण झाला तर दहावी पर्यंत तो गणितात नापास होणे केवळ अशक्यच आहे.या क्रिया साधारणपणे ३० मिनिटांच्या एका तासिकेत उत्तम समजतात.पुढे त्याच्या भरपूर सरावासाठी सापशिडी सारखा 'आकाश- पाताळ', असा एक खेळ तयार केला आहे.कागदाच्या घड्या घालणे,कापणे,चिकटविणे,यातून हौसेने मुलेमुली विमान,होड्या,भिरभिरे,अशा कितीतरी कलाकृती बनवितात आणि त्यात तासनतास रमतात.याचा वापर करुन भूमितीतील सर्व गुणधर्म उत्तम पडताळता येतात.यावर आमच्या 'ज्ञानेश बालसदन' मधील मुलींच्या मदतीने एक व्हिडिओ सुद्धा यू ट्यूबवर उपलब्ध आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा मार्फत मूलभूत गणितावर आधारित २३ व्हिडिओ क्लिपस् सुद्धा यू ट्यूबवर उपलब्ध आहेत.जादू आणि कोडी अशा प्रकारातूनही ह्या गोष्टी चांगल्या दृढ करता येतात.
एकांकिका,पथनाट्य,अभ्यास नाट्य.
अशा प्रकारामुळे मनोरंजना बरोबरच अनौपचारिकपणे पाठ्यभागाचे दृढीकरण होते.शिवाय आपल्याच मित्र मैत्रिणींचा त्यात सहभाग असल्याने हे एकाग्रतेने पाहिले जाते.प्रत्येक पाठ्यभागावर असे कृती आणि प्रयोगासह अभ्यास नाट्य तयार करता येते.मराठी,इतिहास,भूगोल, इंग्रजी,या विषयांच्या बाबत असे अल्प प्रयोग झाले आहेत. असा यशस्वी प्रयोग गणित विज्ञान या बाबतही उत्तम करता येतो.
व्हिडिओ सारख्या तंत्रज्ञानाचा फायदा.
प्रत्येक विद्यार्थ्याचा शिकण्याचा,आकलनाचा,वेग वेगवेगळा आहे. शिवाय बहुतेक विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट बऱ्याच वेळा सांगितल्यावरच कळते परंतु हे,शिक्षक कितीवेळा समजावून सांगतील? पुस्तक आणि व्हिडिओ ह्या आपल्या वेगाने, हवे तेव्हा आणि हवे तितक्या वेळा शिकवितात. शिवाय 'गाढव मूर्ख' असे न म्हणता.यातही क्लोज अप,झुमिंग सारख्या इफेक्टस् मुळे हे सारे 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' असे होते.
गोष्ट,विनोद,दृष्टांत,चुटके?यांच्या मदतीने साहचर्य
प्रत्येक संकल्पनेसाठी अशा गोष्टींचा परिणामकारकपणे वापर,हा संकल्पना ठसविण्यास पूरक ठरतो.'कावळा आणि रांजणातील पाणी',या गोष्टीतून आर्किमिडिजचे तत्त्व कमी वेळात उत्तम ठसते.'सवाल-जबाब',सारख्या प्रयोगातून शास्त्रीय ,गणिती,ऐतिहासिक,भौगोलिक कारणे,तत्त्वे, उत्तम समजतात.दिंडी,भारुड,पोवाडा,या सारखे प्रयोग विषय समजण्यास पूरक ठरतात.
'कीर्तन म्हणजे या सर्व कौशल्यांनी युक्त असा प्रयोग'
कीर्तन हा प्रयोग, एक- एक पूर्ण प्रकरण समजाऊन देऊ शकेल,असा सर्व कौशल्यांनी युक्त असा उत्तम एकपात्री प्रयोग आहे. हजारो लोकांना एक दोन तास मंत्रमुग्ध करणारा हा प्रयोग मी गणित,विज्ञान,पर्यावरण ,आदी विषयांच्यासाठी वापरला.
एकूणच या सर्व प्रयोगांना पूर्ण महाराष्ट्रात मला उदंड प्रतिसाद मिळाला.याचा वापर शिक्षक पालकांनी करावा हीच अपेक्षा ! या बाबत एक अभ्यासक्रम आखण्याचाही मानस आहे.शिक्षण आणि अभ्यास आवडीचा होण्याचे दृष्टीने केलेला हा प्रयोग पुढील पिढ्यांच्या साठी वरदान ठरेल अशी खात्री आहे.
(9545949655)