Good Parenting : कितीही योग्य आणि गुलाबी वाटला, तरी करिअर हा ‘सोक्षमोक्ष’ लावण्याचा विषय नाही..
दिवस दहावी-बारावीच्या परीक्षांचे आहेत. काहींच्या परीक्षांचे शेवट आता दृष्टिपथात आहेत, काहींचे महत्त्वाचे विषय आटपले आहेत आणि राहिलेल्या दोन-तीन वेगळ्या विषयांच्या परीक्षा आणखी काही काळ रेंगाळणार आहेत.
त्यानंतर सिझन सुरू होईल विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्टचा अर्थात सीईटींचा. सीईटींमुळे दहावी-बारावीच्या परीक्षांची उपयुक्तता हा या सिझनमधला अनेक घरांमधल्या जेवणाच्या टेबलांवरचा हॉट टॉपिक असला, तरी हे दोन्ही टप्पे आपल्या मुलांच्याबाबतीतल्या ‘पुढे काय आणि कसे?’ याप्रश्नांच्या उत्तरांकडे घेऊन जाणारे महत्त्वाचे टप्पे आहेत, हे खरेच.
कुटुंब, करिअर, संपत्ती, प्रतिष्ठा, स्थैर्य अशा सगळ्या लांबलचक प्रवासात हेराक्लिटस ऑफ इफेससचे वळण पुन्हा पुन्हा येत असते.
त्यातही आपण सारे सध्या ज्या काळात वावरतो आहोत तो काळ तर, ‘चेंज इज द ओन्ली कॉन्स्टन्ट इन द लाइफ’ -आयुष्यात बदलच काय तो शाश्वत असतो -हे ग्रीक तत्त्वज्ञ हेराक्लिटसचे म्हणणेच तेवढे न बदलणारे असते, याची कधी नव्हे इतकी रोकडी प्रचिती देणारा.
जागतिकीकरण, खुली स्पर्धा आणि हरघडीला बदलणाऱ्या तंत्रज्ञानाने आपल्या सगळ्यांच्याच जगण्याच्या पद्धतींमध्ये मोठे बदल घडवून आणले आहेत.
आजूबाजूची परिस्थिती, राहणीमान, गरजा आणि आपल्या आकांक्षांमध्येही मोठे बदल झाले आहेत, होत आहेत, होणारही आहेत. परिणामी अनेक कौशल्ये आणि त्यांच्याशी जोडलेले व्यवसाय इतिहासजमा झाले, अनेक व्यवसायांनी कात टाकली आणि कितीएक व्यवसाय नव्याने निर्माण झाले.
या नव्या वाटा जशा खुल्या झाल्या तशी न धडपडता त्या वाटांवर चालण्यासाठी काही नवी कौशल्येही आवश्यक ठरू लागली. कोणतेतरी शिक्षण घ्यायचे, त्याच कधीकाळी बांधलेल्या शिदोरीच्या बळावर स्थैर्य मिळवू पाहायचे किंवा वेगळी पण एकचएक दिशा धरायची, नाइलाजच झाला तर थोडेफार बदल स्वीकारत मार्गक्रमण करण्याचे दिवस आता मागे पडले आहेत.
‘बाबा वाक्यं प्रमाणं’ पठडीतून किंवा कोणत्यातरी अथवा कोणाच्यातरी प्रभावाखाली करिअरचे निर्णय घेण्याचेही हे दिवस नाहीत.
परीक्षा सुरू असताना पालकांचे आपल्या मुलांबरोबरचे कम्युनिकेशन कसे असावे, याविषयी अनेक मानसशास्त्रज्ञांनी, समुपदेशकांनी खूप सारे लिहून ठेवले आहे.
परीक्षांच्या दिवसांमध्ये मुलांना कोणतेही, विशेषतः निकालाचे, दडपण जाणवू न देणे, आम्ही तुझ्याबरोबर आहोत हा विश्वास मुलाला देणे हे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच मुलांच्या करिअरच्या बाबतीत शांतपणे काही विचार करण्याची, करिअरचा एखादा मार्ग आपल्याला आपल्या मुलांच्या भवितव्याच्यादृष्टीने कितीही भरवशाचा, योग्य आणि गुलाबी वाटला, तरी करिअर हा ‘सोक्षमोक्ष’ लावण्याचा विषय नाही, ही खूणगाठ पालकांनीच आपल्या मनाशी बांधायला हवी. ही एकप्रकारे पालकांचीही परीक्षाच.
मुलांचा कल जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधणे हाही याच परीक्षेचा एक भाग. अर्थात आजचे बरेचसे पालक या परीक्षेला सामोरे जातात ते मूल आठवीत गेल्यापासूनच. त्या टप्प्यावर सुरू झालेली ही परीक्षा पुढची चार-पाच वर्षे सुरूच राहते. आणि हे निर्णय गुंतागुतीचे खरेच. पालकांच्या मनात असतात ते मुलाच्या, मुलीच्या भवितव्याविषयीचे दूरगामी विचार. भविष्यातल्या त्यांच्या स्थैर्याचे, सुघड आयुष्याचे.
पण मुलांचे मानसशास्त्र जाणणाऱ्यांना विचाराल, तर ते सांगतील मुलांच्या क्षमता त्यावयात अजून फुलत असतात. त्यांच्यालेखी अजूनही वर्तमानाचं महत्त्व मोठे असते. इथे परीक्षा असते ती मुलांच्या मनात करिअरविषयी काही अस्पष्ट कल्पना तयार व्हायला लागलेल्या असल्या तरी त्या समजावून घेत त्याला दिशा देण्याच्या प्रयत्नांची.
समुपदेशन तज्ज्ञ आणि सकाळ साप्ताहिकच्या लेखिका डॉ. वैशाली देशमुख यांचे शब्द उसने घेऊन सांगायचे, तर मुले आपल्याला वाटतात तेवढी लहान नसतात आणि आपल्या अपेक्षांना पुरी पडतील एवढी परिपक्वही नसतात.
पालकांची परीक्षा इथे अधिक गहिरी होते कारण मुलांना करिअर नावाच्या वाटेची ओळख करून देताना मुलांच्या बोटाला धरून, त्यांच्या आवडीनिवडी, कल यांविषयी त्यांच्याशी संवाद साधून, त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा अंदाज घेऊन, आणि त्याबरोबरच त्यांच्या बरोबरीने उभे राहण्याच्या आपल्याही क्षमतांचा अंदाज घेऊन त्या करिअरच्या वाटेचा विचार करणे आता आवश्यक झाले आहे.
करिअरचे कल्पनेच्या बाहेरचे ऑप्शन आजूबाजूला असताना, आणि निर्माण होत असताना; आपल्या आयुष्यातल्या बदलांना, तणावांना तोंड देताना, मुलांच्या भविष्याला आकार देऊ शकणारे वर्तमानातले बदल समजावून घ्यायचे हा पालकांच्या आताच्या पिढीच्या प्रवासातला कदाचित सर्वात अवघड भाग असेल.
या परीक्षांकडे पाहायचे आहे ते या दृष्टीनेही. प्रयत्न मात्र आपल्या मुलाचा, मुलीचा पुढचा प्रवास आनंदमार्गाने व्हावा याच दिशेने असणे अधिक श्रेयस्कर.
या परीक्षांना सामोरे जाणाऱ्या, जात असणाऱ्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
COMMENTS